जळगावहून नागपूरकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मार्गासह सुरत मार्गावरूनही अनेक गाड्या नागपूरकडे जात असतात. मात्र, सुरतकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या जळगाव स्टेशनवर येत असताना, या गाड्या `प्लॅटफाॅर्म` क्रमांक तीनवर येणार की पाच वर येणार, याबाबत जळगाव रेल्वे प्रशासनाकडून लवकर जाहीर करण्यात येत नाही. तसेच याबाबत चौकशी करूनही प्रवाशांना गाडी नेमक्या कुठल्या `प्लॅटफाॅर्म`वर येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून, अनेक प्रवासी खाली `प्लॅटफाॅर्म`वर न जाता, दादऱ्यावरच थांबलेले असतात आणि गाडी येण्याच्या दोन ते तीन मिनिटाआधी `प्लॅटफाॅर्म`ची घोषणा होत असल्यामुळे प्रवाशांना धावपळ करीत `प्लॅटफाॅर्म`वर जावे लागत आहे. परिणामी यामुळे एखाद्या प्रवाशाचा दादऱ्यावरून पाय अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो :
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी :
जळगाव रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी येणाऱ्या गाडीच्या `प्लॅटफाॅर्म`ची घोषणा होत असून, संबंधित `प्लॅटफाॅर्म`वर हातातील प्रवासाच्या बॅगा घेऊन खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या `प्लॅटफार्म` तीनवर येत असल्यामुळे, अनेक प्रवासी या `प्लॅटफार्म`वर येऊन बसतात; मात्र, ऐनवेळी रेल्वे प्रशासनाकडून येणाऱ्या गाडीचा `प्लॅटफाॅर्म `बदलविण्यात आला असल्याचे सांगण्याचे वारंवार प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून, भुसावळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
इन्फो :
जर तीन क्रमांकाच्या `प्लॅटफाॅर्म `वर एक्सप्रेस किंवा मालगाडी उभी राहिली, तर आम्ही पाचव्या क्रमांकाच्या `प्लॅटफाॅर्म`वर गाडी घेतो. जसा `प्लॅटफाॅर्म `उपलब्ध असेल, त्या ठिकाणी आम्ही गाडी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रवाशांना गाडी कुठल्या ‘प्लॅटफाॅर्म`वर येणार आहे, याची माहिती दहा ते पंधरा मिनिटे आधी उद्घोषणाद्वारे कळवितो. त्यामुळे या वेळात प्रवाशांना सहजच दुसऱ्या `प्लॅटफाॅर्म`वर जाता येते.
अमरचंद अगरवाल, स्टेशन प्रबंधक, जळगाव रेल्वे स्टेशन