लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : प्रियकरासोबत लग्नाला होणारा विरोध, पळून जाऊन लग्न करून पोलीस ठाणे गाठण्याचे प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागात वाढल्याने ‘याड लागलयं प्रेमाचे...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
त्याचे असे झाले की, पहिल्या घटनेत ग्रामीण भागातील या तरुणीला शुक्रवारी हळद लागणार होती. गावातील तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, मात्र घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी गुरुवारी गाव सोडले. मुलगी अचानक घरून निघून गेल्याने चिंतातुर पालकांनी शोध घेतला. कुठेही थांगपत्ता न लागल्याने पालकांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली.
विशेष म्हणजे त्या तरुणीचा आज विवाह होणार होता व दुपारीच ती पोलीस ठाण्यात प्रियकरासोबत लग्न करून हजर झाली. पोलिसांनी पालकांना बोलावले, मात्र तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला.
ओळखीतून प्रेम बहरले
दुसऱ्या घटनेतील तरुणीचा साखरपुडा ठरला होता. तिची ओळख गावाजवळील दुसऱ्या तरुणाशी झाल्याने या ओळखीतून प्रेम बहरले. मात्र पालकांनी ठरवलेल्या तरुणाशीच विवाह करावा लागेल, या चिंतेने तिने त्या तरुणासोबत गाव सोडले व आज लग्न करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पालकांना बोलावले. घरी जाण्यास नकार देतानाच त्या तरुणीने चक्क पोलीस संरक्षण मागितल्याने पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जबाब नोंदवून घेतले. अखेर या दोन्ही घटनेतील प्रेमी युगलांनी पोलिसांसमक्ष गाव सोडून इच्छितस्थळी जाणे पसंद केले.