चोपडा : चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणीने आज दोन वर्षांच्या अंतरानंतर आपले उच्च प्रतीचे सूत परदेशात रवाना करण्यासाठी आज पहिल्या ट्रॅालीचे पूजन चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.
चोपडा सूतगिरणीने २०१८/१९ मध्ये तयार झालेल्या सुताची चीन व इतर परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली होती. त्यामुळे ‘चोपडा सूत’ म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा गिरणीने निर्माण केला होता. परंतु भारत व चीनमधील तणावाची स्थिती तसेच कोविडच्या संसर्गामुळे निर्यातीवर बंदी होती.
शासनाने निर्णय बदलल्यानंतर ९ जून रोजी चीनसाठी सुतगिरणीच्या कार्यस्थळावरुन २० टन सुताची पहिली ट्रॅाली रवाना करण्यात आली. ट्रॅालीचे पूजन संचालिका रंजना नेवे व माजी संचालक श्रीकांत नेवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील, संचालक तुकाराम पाटील, जनरल मॅनेजर विजय पाटील, अधिकारी रतन पाटील, गुलाबराव मराठे, महेश उपाध्याय यांच्यासह कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
फोटो ओळी : चोपडा सुतगिरणी येथे पहिल्या ट्रॅालीच्या पूजनप्रसंगी कैलास पाटील, संचालक तुकाराम पाटील, रंजना नेवे, श्रीकांत नेवे, विजय पाटील आदी.