यावल : भरधाव वेगात अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या डंपरने रिक्षाला जबर धडक दिली. त्यात केऱ्हाळा, ता. रावेर येथील ४२ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे. शहरातील चोपडा रस्त्यावर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल यंत्रणेकडून वेळोवेळी मोहिमा राबवल्या जातात. मात्र, त्यात फारसे यश येत नाही. अवैध वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने धावत असतात. यात अनेक वेळा अपघात होऊ जीवितहानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच अपघात रविवारी रात्री साडेबाराला झाला. किनगावकडून यावलकडे येत असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने यावलकडून किनगावकडे जात असलेल्या रिक्षा (क्रमांक एमएच-१९-एके-६४९) ला जोरदार धडक दिली. त्यात केऱ्हाळा, ता. रावेर येथील ४२ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे. काही येथील काही तरुणांनी तातडीने जखमीस ग्रामीण रुग्णालयात आणले. प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
यावल पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. घटनेनंतर डंपरचालक फरार झाला.