जळगाव : कामे करताना त्यात अडचणी येत असल्याचे मान्य करतो व शहरवासीयांना त्यामुळे होणाऱ्या त्रासाची जाणीवही आहे. फक्त वर्षभर या अडचणी सहन कराव्या लागतील, त्याचे परिणाम व फायदा निश्चित दिसेल व शहरातील सर्व प्रश्न वर्षभरात सुटलेले असतील, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे आयोजित चर्चासत्रात दिले. मनपात सत्तांतर होऊन वर्षपूर्ती झाली तरी वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन भाजपकडून पूर्ण होऊ शकलेले नसताना त्याच दिवशी आमदारांनी पुन्हा एकदा वर्षभराचे आश्वासन दिले आहे, हे विशेष.‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण?’ या विषयावरील चर्चासत्राच्या दुसºया भागाचे आयोजन शनिवार ३ रोजी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. यात आमदार भोळे यांच्यासह माजी महापौर नितीन लढ्ढा, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर हे सहभागी झाले होते. या वेळी रोटरी क्लब जळगाव वेस्टचे अध्यक्ष डॉ.सुशीलकुमार राणे व मानद सचिव सुनील सुखवानी उपस्थित होते. निवेदन गनी मेमन यांनी केले. या वेळी शहरवासीयांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या त्रासाचे खापर मनपावर फोडले. या सोबतच वाहतूक शाखेच्या कारभारामुळे अपघात होत असल्याचाही आरोप करण्यात आला.पुन्हा वर्षभराची प्रतीक्षागेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी झालेल्या चर्चासत्रात शहरातील विकास कामांसाठी मिळालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ८९१ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी या विकास कामांची कालमर्यादा सांगत वर्षभरात सर्व कामे मार्गी लागून शहराचा चेहरामोहरा बदललेला असेल आश्वासन दिले.असे असले तरी गेल्या वर्षभरात अमृत योजना, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण,साफसफाईचा ठेका,हुडकोकर्ज,गाळेप्रश्न असे अनेक प्रश्न कायम आहे. त्यामुळे आताही या आश्वासनावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.आठ दिवसात भूमीगत गटारींचे भूमीपूजनअमृत योजनेचे काम झाल्यानंतर शहरात भूमीगत गटारींचे काम होऊन त्यानंतर रस्त्यांचे कामे होतील. यात भूमीगत गटारींच्या कामाचे भूमीपूजन आठ दिवसात होईल, असे आमदार म्हणाले.१५ दिवसात कोठेही कचरा दिसणार नाहीस्वच्छ भारत योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मिळाला असून त्यात खरेदी केलेल्या घंटागाड्या आठ दिवसात सुरू होतील व १५ दिवसात शहरात कोठेच कचरा दिसणार नाही, असेही ते म्हणाले.या सोबतच वर्ष-दीड वर्षात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, आठवडाभरात पोलीस निवासस्थानांचे भूमीपूजन करण्यासह एलईडी दिव्यांच्या समस्या पाहता मक्तेदारच बदलविणार असल्याचे ते म्हणाले. शहराचे सिंगापूर होईल असे नाही, मात्र येथील प्राथमिक गरजा तरी पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.आकडेवारी खोटी असल्यास राजीनामा देणारआमदार भोळे यांनी चर्चासत्रात अमृत योजना, भूमीगत गटारी, समांतर रस्ते व इतर कामांसाठी आणलेल्या निधीची आकडेवारी सांगितली. त्यावर दीपककुमार गुप्ता यांनी आक्षेप घेत तफावत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर प्रिंट मिस्टेक असल्याचे आमदार भोळे म्हणाले. ही सर्व आकडेवारी आपल्याकडे पुराव्यानिशी असून ती खोटी असल्यास आपण केव्हाही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हानही आमदारांनी दिले.तांत्रिक माहितीची अभाव, राजकीय प्रचार जोरातअमृत योजनेचे काम करताना त्याची माहिती फलकावर लावण्यात यावी, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केले. ज्या भागात कामे होणार तेथे पूर्वसूचना द्यावी तसेच तसे स्पष्ट फलक लावणे अपेक्षित आहे. मात्र कामांची तांत्रिक माहिती न देता शहरात राजकीय माहितीचा प्रचार जोरात केला जात असल्याचा आरोपही शिवराम पाटील यांनी केला.
जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी पुन्हा वर्षभराचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:38 PM