हरताळा, ता.मुक्ताईनगर : कोरोनाची लाट बरीचशी ओसरल्याने, यंदा तरी आषाढी एकादशीनिमित्त वारी होईल आणि विठुरायाचे दर्शन घेता येईल, अशी आशा हरताळा व परिसरातील वारकऱ्यांना होती, परंतु शासनाने वारीवर निर्बंध कायम ठेवल्याने सलग दुसऱ्या वर्षी वारकरी पंढरीच्या वारीला मुकणार आहेत.
हरताळा, सालबर्डी, कोथळी परिसरातून दरवर्षी भक्त गावागावातून मुक्ताई पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी पायी दिंडीतून विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. पेरण्या संपल्या की, वारकऱ्याला ओढ लागायची ती म्हणजे सगळ्यांच्या भेटीची, त्यात पांडुरंगाच्या भेटीची मोठी आस. विशेष महत्त्व देत ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस...’ म्हणत प्रत्येक वारकऱ्याचे पाय टाळमृदंगाच्या गजरात पंढरीच्या वाटेवर चालू लागायचे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेडे झालेले शेकडो भाविक ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीची वाट धरायचे, परंतु कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांची वारी चुकत आहे. तीस, चाळीस वर्षे झाली, सलग विठुरायाची भेट घेत कोणी पाई, तर कोणी आपल्या स्वतःच्या वाहनाने किंवा बसने जात विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीची वारी करत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने यंदा तरी पंढरीची वारी होईल आणि विठुरायाचे दर्शन होईल, अशी आशा वारकऱ्यांना होती, परंतु शासनाच्या निर्णयामुळे यंदाही वारकरी या वारीला मुकणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आठवणींची वारी भावनांचा विठ्ठल
टाळमृदंगाच्या गजरात वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघत असल्याच्या आठवणींना उजाळा देत, गावात पारावर चावडीवरती आबाल वृद्ध वारकऱ्यांच्या गप्पा रंगत आहेत. मुक्काम इथे असता, असे झाले असते... अशी आठवणींची वारीच आता आहे, पण वारी नाही, हे सत्य स्वीकारताना भक्तांचा ऊर गहिवरतो. चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आठवण होते. काहीही असले, तरी विठुरायाची आठवण कायम आहे. भजन, कीर्तनाचे आवाज नसले व ज्ञानोबा, तुकाराम यांचा जयघोष नसला, तसेच भगवी पताका आणि तुळशीवृंदावन डोक्यावर नसले, तरी आठवणींची वारी भावनांच्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघाली आहे.
वारकरी प्रतिक्रिया
मागील तीस वर्षांपासून मी व माझ्या परिवारासह गावातील वारकऱ्यांसोबत पंढरीची वारी करतो. आषाढी जवळ आली की, पाय आणि मन पंढरीच्या वाटेने धावू लागतात. पायी दिंडी सोहळ्यात मिळणारा निर्मळ आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पोरके झालो आहोत. आज पाय जरी जागेवर थांबले असले, तरी मन मात्र कायम दिंडीत रमलेले असते. हे विठुराया कोरोनाचे संकट लवकर दूर कर व आम्हा वारकऱ्यांना पुन्हा एकदा तुझ्या या भक्ती सोहळ्यात जाऊ दे.
- महादू त्रंबक पाटील, वारकरी हरताळा, ता.मुक्ताईनगर.