लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, मात्र बारावीच्या परीक्षेचे काय, बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बारावीच्या परीक्षेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी, परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय कधी घेतला जाणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जात आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला, विद्यार्थी अभ्यास करत आहेत. पण, राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
लवकरात लवकर परीक्षा घ्यायला हवी. एप्रिलमध्ये होणारी जेईई-नीट परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. तर सीईटीबाबतही अद्याप काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे परीक्षा होतील की नाही, हे स्पष्ट करावे व विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा.
- गौरी वाघुळदे, विद्यार्थिनी
----------------------
सीईटी, नीटची तयारी करावयाची आहे. वर्ष वाया जात आहे. त्यामुळे तत्काळ बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर करावे. ऑफलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात यावी. त्याबाबत लवकर निर्णय घ्यावा.
- मयुराक्षी खडायते, विद्यार्थिनी
----------------------
मे महिन्यात परीक्षा व्हायला हवी होती. आता शासनाने परीक्षा घेण्याचे अधिकार महाविद्यालयांना द्यावे व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी. परिणामी, गर्दी होणार नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट करावी व विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा.
- सुमित महाजन, विद्यार्थी