-जिजाबराव वाघकोरोना संसर्गजन्य आजाराचे भयावह सावट आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आलेली यंदाची अक्षय तृतीया (आखाजी) काहीसी वेगळी ठरते. अगदी कोरोनाच्या भाषेत बोलायचे तर ती 'पॉझिटीव्ह' आणि 'निगेटीव्ह'देखील आहे. संपूर्ण बाजारावरच 'कोरोनाकळा' असे उदासीचे सावट असले तरी, घराघरात मात्र कुटुंबाचे सदस्य एकत्र आल्याने पाॉझिटीव्ह फिलिंग आहेत. तथापि, टाळेबंदीसह सोशल डिस्टन्सिंगमुळे निगेटीव्ह माहोल आहे. अक्षय तृतीयेसाठी महत्वाचा घटक मानल्या गेलेल्या 'मातीच्या घागर' विक्रीवरही कोरोनाचे सावटच व्यापले आहे. एरवी अक्षय तृतीयेपूर्वी घागर बनविण्यासाठी गजबजून निघणारे 'कुंभारवाडे' यंदा शांत आहे. आखाजीच्या मुहुर्तावर खरीपाच्या हंगामाची तयारी शेतकरी करतात. यंदा ग्रामीण भागात काहीअंशी याला कात्री लागलीय.केलेले दान आणि हवन यांचा क्षय ज्या पर्वात होत नाही ते अक्षय पर्व. याकाळात जे कर्म केले जाते ते अक्षय (अविनाशी) असते. संस्कृतीच्या पटलावर आखाजीला असे मानाचे पान आहे. यंदा मात्र टाळेबंदी आणि कोरोनाने ही घडी पूर्णतः विस्कटून टाकली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरीक्त सर्वत्र 'कुलूपबंद' वातावरण असल्याने साडेतीनपैकी आखाजीच्या पूर्ण मुहूर्तावर मंदीचे मळभ आहेत.देव व पित्तरांना उद्देशून केलेले या पर्वातील सर्व कर्म अक्षय असतात. त्यामुळे काहीशा निरुत्साहातच यंदाची अक्षय तृतीया पार पडणार आहे.अक्षय तृतीया शुभ पर्वाचा पूर्ण मुहूर्त असल्याने दरवर्षी बाजारात मोठी उलाढाल होते. नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू खरेदी करणे, मोठे आर्थिक व्यवहार, शुभ कामे, वाहन खरेदी, कपडे खरेदी, शुभ कार्य यांना आखाजीच्या पर्वणीत उधाण येते. यावर्षी मात्र टाळेबंदीने हे सर्व हिरावले आहे.प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क बांधणे, शिकताना - खोकताना काळजी घेणे, सॕनिटायझर, हात धुणे यांचा धोश्या सारखा कानांमध्ये घोंगावतो आहे. टाळेबंदीने वस्तू खरेदी - विक्रीची साखळी खंडित केली असली तरी परिवारांची विस्कटलेली वीण मात्र सुबक विणलीय. घराघरात नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने लांब असणारी कुटुंबातील माणसे यावर्षी मोठ्या संख्येने एकाच छताखाली आली आहेत. जिथे कोरोनाचे सावट कमी आहे. तिथे कुटुंबांच्या मौजमस्तीला उधाण आले आहे. जोडून आलेल्या अक्षय तृतीयेची पर्वणी म्हणूनच अशा स्वरुपात पाॕझिटीव्ह ठरलीय.शांत असणा-या 'चाकावरती'खान्देशात अक्षय तृतीयेचा वेगळा लौकीक आहे. पित्तरांचे पुण्यस्मरण म्हणून पुजावयाची घागर आणि आंब्याच्या रसासोबत पुरणपोळीच्या नैवेद्याने घराघरात मांगल्याचा दरवळ असतो. यावर्षी स्थिती वेगळी आहे. कुंभार बांधवांना अजूनही 'घागर' विक्रीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घागर तयार करण्याचे त्यांचे चाक यंदा शांत आहे.काहींनी मध्य प्रदेशातून तयार घागरी मागविल्या आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने घागर चांगलीच महागलीय. गेल्यावर्षी ६० रुपयांना मिळणारी घागर यंदा ८० रुपये प्रति नग अशी भाव खाऊन आहे.संचारबंदीमुळे सातासमुद्रापार जाऊ न शकलेला कोकणचा राजा 'हापूस' थेट खान्देशात दारादारात येऊन पोहचलाय. गेल्या काही दिवसात हापूसची घरपोच डिलेव्हरी दिली जात असल्याने यंदाची अक्षय तृतीया हापूसच्या गोडव्याने यादगार ठरणार आहे.बाजारावर मंदीची मरगळटाळेबंदी असल्याने अनेकांनी नव्या घरांचे 'वास्तूप्रवेश' लांबणीवर टाकले आहे. दुचाकी व चारचाकी विक्रीच्या शोरुमला 'टाळे' असल्याने नवीन गाडी घेण्याचे बेतही अनेकांना पुढे ढकलावे लागले आहे. केवळ एक औपचारिकता अशीच यंदाची अक्षय तृतीया पर्वणी असणार आहे.- जिजाबराव वाघ, चाळीसगाव, जि. जळगाव
यंदाची अक्षय तृतीया : पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 2:24 PM