जळगाव - बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली. त्या टिकेला आता सुषमा अंधारे यांनी जगळगावात पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं.
सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. गुलाबराव पाटील चोपडा तालुक्यातील धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली होती. त्यावर, सुषमा अंधारे यांनीही जळगाव दौऱ्यातच गुलाबरावांवर प्रहार केला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील, तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला अधिकार आहे, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.
सुप्रीम कोर्टाचा अनादर होणारं कोणतंही वक्तव्य करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. "सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं" असे म्हणत न्यायालयीन लढाईवर भाष्य केलं. आमदारांमुळे शिवसैनिक नसतात तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. लोकांचे पाठबळ नसल्यानेच आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवसेना ही अन्यायाविरोधातली मशाल हातात घेऊन कोणत्याही दवाबाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभी असेल. सध्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचे राजकारण सुरु आहे, असे म्हणत त्यांमनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याकडे लक्ष वेधले.
महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर 'ये डर मुझे अच्छा लगा, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. आजपासून महाप्रबोधन यात्रेतील दुसर्या टप्प्यासाठी त्या जळगाव जिल्ह्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
गुलाबरावांची उद्धव ठाकरेंवरही टीका
आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.