अमळनेर : आगामी पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी त्यांच्या घरावर अमळनेर युवा मल्हार सेनेतर्फे शुक्रवारी नेण्यात आलेल्या माेर्चातील प्रतिनिधींना देण्यात आले.
युवा मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत विश्रामगृह, तहसील कचेरीवरून आमदार पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा नेऊन तेथ घोषणा देण्यात आल्या. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी निवेदन दिले.
निवेदनात धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडावा, आदिवासी समाजाला मिळणाऱ्या एक हजार कोटीच्या योजनांचा लाभ धनगर समाजाला द्या, धनगर समाजातर्फे दाखल याचिकांवर जलद गतीने सुनावणी घ्या,याचिकेचा खर्च सरकार उचलावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
इतर राज्यात दिले आरक्षण
समाजाची भूमिका मांडताना आरक्षण संघर्ष समितीचे सदस्य डी. ए. धनगर म्हणाले की, धनगड जातीला एसटी आरक्षण इतर राज्यात देण्यात आले आहे आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार धनगर आणि धनगड एकच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी नात्याने अधिवेशनात योग्य भूमिका मांडण्याचा आग्रह करण्यात आला.
पावसाळी अधिवेशनात चर्चा
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात समाजाची मागणी शासन दरबारी मांडून आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणू अशी ग्वाही युवा मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली. यावेळी युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष देवीदास लांडगे, धनगर ऐक्य परिषदेचे समन्वयक डी. ए. धनगर,दशरथ लांडगे, शांताराम ठाकरे,चंद्रकांत कंखरे, हरचंद लांडगे, रमेश धनगर, अरुण ठाकरे,संदीप पाटील, आलेश धनगर, अनिल धनगर, धनजय धनगर, शशिकांत आढावे, किशोर धनगर, स्वप्नील ठाकरे, योगीराज ठाकरे, निखिल ठाकरे, प्रा ए.ए निळे, राहुल धनगर , योगेश धनगर, तुकाराम धनगर, अनिल ठाकरे, हिरालाल ठाकरे, सुभाष ठाकरे सहभागी झाले होते.
आमदार अनिल पाटील यांच्या घरावर मोर्चा नेऊन युवा मल्हार सेनेने आरक्षणासाठी निवेदन दिले.
( छाया- अंबिका फोटो)