गांधीधाम एक्सप्रेस खुर्दा स्टेशनपर्यंतच धावणार
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तांत्रिक कारणामुळे गांधीधाम-पुरी एक्सप्रेस(गाडी क्रमांक ०९४९३-९४) ही गाडी ओडिसा प्रातांतील खुर्दा स्टेशन पर्यंतच सोडण्यात येणार आहे. पुढे ओडिसा राज्यात ही गाडी जाणार नाही, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली असून, प्रवाशांनी याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयासमोर वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील तहसील कार्यालयात नागरिकांनी शासकीय कामासाठी सकाळपासूनच गर्दी केल्याने, तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच जिल्हा परिषदेसमोरील वाहने उभी असल्याने, या कोंडीत अधिकच भर पडली आहे. त्यात जिल्हा परिषदेकडून टॉवर चौकाकडे येणारा रस्ता बंद असल्यामुळे, दिवसभर बळीराम पेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.
पॅसेंजर सुरू करण्यासाठी खासदारांना निवेदन
जळगाव : सध्या अनलॉक झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागातून मुंबई, नाशिक मार्गावर धावणाऱ्या एकही पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे चाकरमानी प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाड्या सुरू करण्याबाबत जळगाव, पाचोरा व चाळीसगाव येथील प्रवाशांनी रविवारी खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट भोळे उपस्थित होते.
सुरत पॅसेंजरची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : जळगावहून रात्रीची भुसावळ-सुरत पॅसेंजरला चाकरमानी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, जळगावला रात्री ही गाडी नऊ वाजता येत असल्यामुळे, पुढे अमळनेरकडे जातांना या गाडीला अधिकच विलंब होतो. परिणामी प्रवाशानांही घरी जायला विलंब होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाडीची वेळ सायंकाळची करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.