विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27- औषधी घेऊन कोणत्याही आजारावर केवळ नियंत्रण मिळविता येते, यातून आजार बरा होत नाही. मात्र योग व निसर्गोपचाराने आजार पूर्णपणे बरा होऊन त्यापासून मुक्ती मिळते, असा विश्वास योग विद्या गुरुकुलचे (नाशिक) कुलगुरु तथा योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास मंडलीक यांनी व्यक्त केला. मू.जे. महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथीच्या वतीने 23 रोजी ‘निसर्गधारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ते शहरात आले होते, त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. तो असा..
प्रश्न - औषध विरहीत उपचार पद्धती नेमकी कशी असते?डॉ. मंडलिक- प्रत्येकाच्या शरीरात आजार बरा करण्याची निसर्गाने दिलेली क्षमता असते. रुग्णाची हीच शारिरीक क्षमता औषध विरहीत उपचार पद्धतीने वाढविली जाते. पंचमहाभुतांद्वारे मानवी शरीर तयार झाल्याने यात पंचमहाभौतिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात.
प्रश्न : निसर्गोपचार पद्धतीचे काय फायदे आहेत ?डॉ. मंडलिक- निसर्गोपचार पद्धती ही सर्वच पॅथींपेक्षा सरस आहे. गोळ्य़ा-औषधीवर मोठय़ा प्रमाणात खर्च करुनही आजार पूर्णपणे बरा होत नाही तर त्यावर नियंत्रण मिळविता येते. मात्र निसर्गोपचार पद्धती पूर्णपणे मोफत असून त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होतो.
प्रश्न : धकाधकीच्या जीवनात योगासाठी वेळ नसल्याची अनेकांची तक्रार असते, याबाबत काय सांगाल?डॉ. मंडलिक- हो हे खरे आहे. मात्र, एकदा जर शरीराला योगाची सवय झाली तर दिवसभर उत्साह राहतो. त्यामुळे कामेदेखील कमी वेळात होतात व वेळ शिल्लक राहिल्याने त्या वेळेचा योगासाठी उपयोग करता येऊ शकतो.
प्रश्न : निसर्गोपचाराचा प्रसार होत आहे का?डॉ. मंडलिक- निसर्गोपचाराचा प्रसार वेगाने होत असून केंद्र आणि राज्य सरकारदेखील यासाठी प्रय}शील आहे. सरकारकडून आता योग आणि निसर्गोपचार परिषद स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील आता सर्वच विद्यापीठांमध्ये निसर्गोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले असून सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी केंद्रात निसर्गोपचार अभ्यासक्रम शिकवला जातो. तेदेखील पहिलेच केंद्र ठरले आहे.पतीला साथ देणे हेच ‘करिअर’ समजा - पौर्णिमा मंडलीकडॉ. विश्वास मंडलीक यांच्या योग प्रसाराच्या कार्यात त्यांना पत्नी पौर्णिमा मंडलीक याही साथ देत आहेत.