सुनील पाटील
जळगाव : सुरळीत चालेल्या संसारात वेगवेगळ्या कारणांनी मिठाचा खडा पडून एकमेकांपासून दुरावलेल्या जिल्ह्यातील १३५ दाम्पत्यांना एकत्र आणून त्यांची संसारवेल पुन्हा बहरली आहे. ‘आधी तुझं माझं जमेना;अन् आता तुझ्यावाचून करमेना!’असेच वर्णन या प्रकरणांचे करावे लागेल. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातील सावित्रीच्या लेकींनी या दाम्पत्यांच्या जीवनात समेट घडवून आणला आहे.
महिलांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार रोखण्यासह त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत समुपदेशनाचे काम सुरु असते.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आहे सेल
महिला व पुरुषांमधील कौटुंबिक वादात समेट घडवून आणण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारीत हा सेल आहे. सकाळी १० ते सायंकाळी सात अशा वेळेत येथे कार्य चालते. ज्या प्रकरणात समेट घडलाच नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाणे किंवा न्यायालयात पाठविली जातात.
क्षुल्लक कारणावरुन होताहेत वाद
कधी बायको माहेरी जाते म्हणून तर कधी सासू-सासरे जास्तच कटकट करतात. मुलांना वेळेवर खायलाच दिले नाही. त्यांचा क्लासच घेतला नाही, यासारख्या क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेलेली असते तर कधी सातत्याने पती किंवा पत्नी मोबाईलमध्येच गुंतलेले असता, त्यावरुन संशयाचे भू्त मनात निर्माण होतात आदी कारणांमुळे वाद होत असल्याचे दिसून आलेले आहे.
कोट...
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १२९० तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, त्यापैकी १३५ तक्रारीत समेट घडवून आणला आहे. वादाचे कारणे अतिशय क्षुल्लक आहेत. पती-पत्नी एकत्र यावेत, त्यांचा संसार अधिक बहरला पाहिजे, हीच आमची अपेक्षा असते. त्याच दृष्टीकोणातून आमचे कार्य चालते. लांब राहणाऱ्या दाम्पत्यांना यायला उशीर लागत असल्याने अशा प्रकरणात तडजोड उशिरा होते.
-वैशाली पाटील, समन्वयक, महिला सहाय्य कक्ष
नऊ महिन्यात महिला सहाय्य कक्षाकडे आलेल्या तक्रारी
दाखल संख्या : १२९०
एकत्र आलेले दाम्पत्य : १३५