राज मालती नगर : वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राज मालती नगरमध्ये गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईपलाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.
गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली; मात्र या भागातील समस्या आजही जैसे थे आहेत. या भागात बहुतांश ठिकाणी मनपातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे;मात्र राज मालती नगरमध्येच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. नागरिक परिसरातील रहिवाशांकडून विकतचे पाणी घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत. दर महिन्याला बोअर वेलच्या आणि नळाच्या पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र महिना लावला असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पहिले पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या; मात्र एकाही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तर सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या परिस्थितीकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
इन्फो:
अनेक वर्षांपासून विकतचे घ्यावे लागतेय पाणी
या भागातील रहिवाशांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी पिण्यासाठी घ्यावे लागत आहे. दर महिन्याला यासाठी ठराविक खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च केले असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे रहिवाशांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे विकतचे पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्येकडे मनपाने लक्ष द्यायला हवे.
जितू गायकवाड, रहिवासी
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
शेख इस्माईल, रहिवासी
पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी घेण्याची शहरातील ही पहिलीच घटना असावी, असे असतानाही मनपा ना लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही. ते फक्त निवडणुकीपुरतेच तोंड दाखवितात व नंतर गायब होतात.
रंजिता खुळे, रहिवासी
इन्फो
मनपातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.
वत्सलाबाई गायकवाड, रहिवासी