जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपत्कालीन शेल्टर टेण्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यू शीट’चे उद्घाटन ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आमदार मंगेश चव्हाण, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. राऊळ, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, आपत्ती काळात राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम मदतीसाठी येत असतात आणि ही आपत्ती जास्त काळ असल्यास राहण्यासाठी तसेच बचाव कार्यातील नागरिकांना तत्काळ उपचारासाठी या टेण्टचा उपयोग होणार आहे. विविध शासकीय विभागांना मिळणार टेण्ट
जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अशी सर्व सुविधा असलेले १८ टेण्ट मिळाले आहेत. हे टेण्ट पोलिस दल, वन विभाग, महापालिका, नगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टेण्टबद्दल सर्वांना सविस्तर माहिती दिली.