मालती साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती अविनाश साबळे हे एसटी महामंडळात लिपिक पदावर काम करायचे. त्यांचा २००७ मध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. साबळे यांच्या निधनानंतर मालती यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांनी मुलांचे शिक्षण व लग्नासाठी कोळाणी (ता. खेड) येथील शेती विकली होती, तसेच उर्वरित रक्कम म्हातारपणी आजारांवरील उपचारासाठी बँकेत ठेवली होती. दरम्यान, एका वृत्तपत्रातील बीएचआरची जाहिरात पाहून त्या आळंदी येथील बीएचआरच्या शाखेत गेल्या. ठेवीवर १३ टक्के व्याज देणारी ही जाहिरात होती. त्यानुसार मालती यांनी १२ लाख रुपये बीएचआरच्या आळंदी शाखेत ठेवले. मुदत संपल्यानंतर त्यांना १३ लाख ६५ हजार रुपये परत करण्याचे आश्वासन बीएचआरने केले होते. दरम्यान, काही वर्षातच बीएचआरच्या संचालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहार व फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असल्याची माहिती मालती यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आळंदीच्या शाखेत जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेेव्हा ही शाखा बंद पडली होती.
दरम्यान, २०१६ मध्ये अचानक मालती यांच्या घरी दोन अनोळखी लोक पोहोचले. त्यांनी बीएचआर संस्था आता बुडाली आहे. आता कर्जदारांकडून पैसे वसूल झाल्यानंतरच तुमचे पैसे परत केले जातील. अवसायक कंडारे हा आमचाच माणूस आहे. तेव्हा तुम्ही २० टक्के रक्कम घेऊन पावती आम्हाला विकून टाका. असे त्या दोघांनी मालती यांना सांगितले. आमचे कष्टाचे पैसे आहेत. पूर्ण परत घेऊ, असे सांगत मालती यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. यानंतर सन २०१९ मध्ये ते दोघे परत मालती यांच्याकडे गेले. यावेळी त्यांनी २० ऐवजी ३५ टक्के रक्कम परत देण्याचे सांगितले. यावेळीदेखील मालती यांनी प्रस्ताव फेटाळला. यानंतर सन २०२० मध्ये पुन्हा हे दोघे मालती यांच्या घरी गेले. यावेळी त्यांनी थेट मालती यांना धमकी दिली. ‘तू मेलीस तरी तुझे पैसे मिळू देणार नाही, कंडारे आमचाच माणूस आहे’ या भाषेत त्यांनी मालती यांना धमकावले. दरम्यान, या धमकीनंतर घाबरलेल्या मालती यांनी पुण्यातील किरण दीक्षित यांच्याकडून संपूर्ण प्रकार समजून घेतला. बीएचआरमधील घोटाळ्यांबाबत दीक्षित यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर मालती यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी आळंदी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.