अमळनेर : तालुक्यात गेल्या १० ते १२ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य असताना मंगळवारी पुण्याहून आलेला एक तरुण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
पुण्याहून दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी परतलेल्या तरुणाला अंगदुखी व पाठदुखीचा त्रास जाणवल्याने त्याची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले. त्याच्या कुटुंबासह परिसरातील ६३ जणांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. सर्व जण निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नागरिकांनी लस घेतली असेल तरी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अमळनेरात सध्या फक्त तीन रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. त्यातील दोघांवर शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची आताची चाचणी निगेटिव्ह आली असून, दुसऱ्याला ३० रोजी डिस्चार्ज मिळणार आहे.
जूनअखेर कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर येण्याच्या वेळीच नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन चिंतित झाले आहे.