लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दारू पिण्यासाठी २० रुपये दिले नाही म्हणून प्रशांत पंडितराव साबळे (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी) या तरुणाच्या पोटात बबलू शेंड्या नावाच्या तरुणाने लोखंडी कैची खुपसल्याची घटना २२ एप्रिल रोजी पंचमुखी हनुमान मंदिर पसिरात दारूच्या अड्ड्यासमोर घडली. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत साबळे हा तरुण २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामदेव बाबा मंदिर परिसरातून पायी जात होता. यावेळी साहेबरावच्या दारूच्या अड्ड्यासमोर मद्यपी बबल्या शेंड्या याने प्रशांतकडे दारू पिण्यासाठी २० रुपये मागितले. प्रशांत याने पैसे देण्यास नकार दिला असता, याचा राग आल्याने बबल्याने त्याच्या खिशातील लोखंडी कैची काढली अन् प्रशांतच्या पोटावर लोखंडी कैचीने दोनवेळा वार केले. यात प्रशांत जखमी झाला, असे प्रशांत याने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.