जळगाव : दुचाकीवर बसून मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाला काही कारण नसताना आठ तरुणांनी बॅटने मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळे नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित विजय सपकाळे (२१, रा.धनाजी काळे नगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
रोहित सपकाळे हा धनाजी काळे नगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी रोहित हा धनाजी काळे नगरातील एका मोकळ्या मैदानावर दुचाकी (क्र. एमएच २० एक्यू ८७७४) ने आला होता. नंतर दुचाकीवर बसून तो मोबाइलवर बोलत होता. तितक्यात तेथे क्रिकेट खेळत असलेल्या अप्पा सोनवणे, मन्या, बबल्या (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासोबत अनोळखी ४ ते ५ जण आले. त्यांनी कारण नसताना बॅट दुचाकीवर मारली. यात दुचाकीचे नुकसान झाले. याचा जाब रोहितने विचारला असता आप्पा सोनवणे याने त्यास बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात रोहित गंभीर जखमी झाला. नंतर त्यास मन्या, बबल्या आणि अनोळखी इतरांनी शिवीगाळ करून दगड मारून फेकले. यात दुचाकीचेही नुकसान झाले. तसेच रोहितच्या खिशातील ७ हजार रुपयेदेखील गहाळ झाले. अखेर सोमवारी रात्री रोहितच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.