जळगाव : लाठ्याकाठ्यांच्या मारहाणीत सागर रमेश पालवे (२४, रा. मालदाभाडी,ता. जामनेर) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर) नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एमआयडीसीतील नवीन गुरांचा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्ट येथे सागर रमेश पालवे हा दोन वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान ट्रान्सपोर्टवर असताना त्याच ठिकाणी चालक म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे व नीलेश रोहिदास गुळवे यांनी खोलीमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. यात सागरला गंभीर दुखापत झाली व ८ रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची आई नीलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील संशयितांची एमआयडीसी पोलिसांनी माहिती काढून ज्ञानेश्वरला मुक्ताईनगर येथून तर नीलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात येऊन न्या. जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, किरण पाटील, सुधीर साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी, संदीप बि-हाडे यांनी केली.