बजरंग पुलावरील घटना : मयत तरूण भुसावळातील शाळेत लिपीक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ येथील शाळेत लिपीक म्हणून कामाला असलेल्या राहूल राजाराम निलम (३५, जामनेर रोड, भुसावळ) या तरुणाने बजरंग बोगदा पुलावर धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळातील जामनेर रोडवरील काशीनाथ नगरातील राहूल राजाराम निलम हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. ते भुसावळातील संत गाडगे महाराज हिंदी हायस्कुलमध्ये लिपीक म्हणून नोकरीस होते. आठ दिवसांपूर्वी त्यांचे पत्नीसोबत भांडण झाल्याने त्यांची पत्नी माहेरी निघून गेल्या. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून राहूल जळगाव शहरातील कानळदा रोडवरील सिद्धीविनायक पार्क परिसरातील हरिओम नगरात राहत असलेला लहान भाऊ राकेश यांच्या सोबत राहत होता.
मित्राकडे जावून येतो सांगितले अन्....
दुपारी जेवण झाल्यानंतर सायंकाळी राहुल याने पिंप्राळा हुडका येथील मित्र चेतन याच्या घरी जावून येतो असे आईला सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ते दुचाकी घेवून घराबाहेर निघाले. नंतर बजरंग बोगद्याजवळ आल्यानंतर त्याने दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी केली. पुलावर चढून त्यांनी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे राहुल यांचा जागीच मृत्यू झाला.
भावाने ओळखले
बजरंग बोगद्याच्या पुलावर घटना घडल्यानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. काहींना ओळख लागल्यानंतर त्यांनी राहुल यांच्या कुटुंबियांना संपर्क साधला. भाऊ राकेश व कुटूंब घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी राहुल यांचा मृतदेह ओळखला. तसेच लोहमार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. राहुल निलम यांच्या पश्चात आई सावित्री, पत्नी दिपिका, मुलगा, भाऊ राकेश व वहिनी असा परिवार आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ मोबाईल, दुचाकी चावी पडलेली पोलिसांना आढळून आली. तसेच दुचाकी देखील बजरंग पुलाजवळ पोलिसांना मिळून आली आहे.