चोपडा : चहार्डी येथील चहार्डी-वेले रस्त्यालगत असलेल्या दगडाच्या खदानीतील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.विजय दशरथ भिल (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. विजय भिल हे २६ रोजीच्या दुपारपासून ते २८ च्या दुपारी १२ वाजेच्या दरम्यान खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर मयताचे भाऊ संजय दशरथ भिल यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली.घटनेबाबत समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व फुगलेल्या अवस्थेतील शव बाहेर काढले. मात्र शव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासारखे नसल्याने जागेवरच चहार्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वाल्मिक पाटील यांनी शवविच्छेदन केले. घटनास्थळी चहार्डी बिटचे मधुकर पवार, पोहेकॉ विद्या इंगळे, पो.कॉ.निलेश लोहार, योगेश शिंदे यांनी शव पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोसील ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल मधुकर पवार करीत आहेत.चहार्डीच्या खदानीतील पाण्यात आत्महत्या करण्याचे तसेच त्यात पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या खदानीत पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. दरम्यान, दहा दिवसांत या प्रकारची दुसरी घटना घडली आहे.