जळगाव : मामाच्या मुलासोबत मेहरुण तलावाकडे फिरायला गेलेला साईनाथ शिवाजी गोपाळ (२२, रा.समता नगर, जळगाव) हा तरुण हातपाय धुतांना पाय घसरुन तलावात पडला व त्यातच तो बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. या तरुणाला शोधून बाहेर काढण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणेने दीड दिवस कोणतेही प्रयत्न केले नाही, किंबहूना फिरकूनही पाहिले नाही, त्यामुळे दोन दिवसापासून हा तरुण पाण्यातच असून भाऊ बाहेर येईल, या भाबड्या आशेवर साईनाथचा भाऊ व बहिण रात्रभर तलावाकाठी बसून आक्रोश करीत होते. गरीबाचे कोणीच नसते असे बोलले जाते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव या कुटुंबाने घेतला.या घटनेबाबत साईनाथ याचा भाऊ सुकलाल याने दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ हा मजुरीचे काम करायचे. बुधवारी साईनाथ व त्याचा भाऊ सुकलाल यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ साफसफाईचे काम मिळाले होते. दुपारपर्यंत तेथे काम केल्यानंतर मामाचा मुलगा ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ व सोनू सुरेश गोपाळ असे दोघं तेथे आले व दुचाकीवर बसवून साईनाथला घेऊन गेले. तिघं जण मेहरुण तलावाकडे फिरायला आले. सेंट टेरेसा शाळेच्या पाठीमागील बाजुस तिघं जण तलावात हातपाय धुवायला उतरले असता साईनाथ हा याचा पाय निसटला व तलावातील खोल खड्डे असलेल्या ठिकाणी पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहिल्यानंतर मामाच्या मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आतमध्ये खोलगट भागात गेला. दोन तास त्याचा शोध घेतल्यानंतर ज्ञानेश्वर व सोनू दोघंही घाबरुन आपल्या घरी निघून गेले. त्यांनी हा प्रकार आईला सांगितला. आईने तातडीने साईनाथच्या आई, वडीलांना सांगून सहा वाजता तलावावर धाव घेतली. नातेवाईकांनी तलावात त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.मोबाईल व कपडे सापडलेतलावाच्या काठी साईनाथ याचे शर्ट आढळून आले. त्याचा भाऊ सुकलाल व बहिण उषा रात्रीपासून तलावाच्याच काठी आक्रोश करीत होते. गुरे चारणाऱ्या मुलांना एक मोबाईल सापडला तो साईनाथचा निघाला. या मुलांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करुन त्यांना धीर दिला. सकाळी समता नगरातील नागरीक मोठ्या संख्येने जमले होते. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबाचा आक्रोश सुरु होता.मामाच्या मुलांसोबत भाऊ तलावावर फिरायला आलेला होता. पाय धुतांना तो तलावात बुडाला. पोलीस वेगवेगळे पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला देत आहेत. पाण्यातून तरंगत वर नाही आला तर घरी निघून जा असे पोलिसांनी सांगितले. पोहणाºया तरुणांना पैसे देऊन भावाचा शोध घेत आहोत.-सुकलाल गोपाळ, भाऊ
तरुण पाण्यात बुडाला; यंत्रणेने फिरकूनही पाहिले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:02 PM