जळगाव : ओएलक्स ॲपवरुन दुचाकी खरेदी करण्याच्या नादात योगेश विठ्ठल तायडे (२२,रा.हरिओम नगर) या तरुणाला ५८ हजार ३७३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन योगेश तायडे हा मेडिकल एजन्सीवर कामाला आहे. त्याला जुनी दुचाकी खरेदी करायची असल्याने ओएलएक्स या ॲपवरुन त्याने एका जणाशी संपर्क साधला. दुचाकीचा व्यवहार २२ हजार ठरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तसेच तायडे याचे आधारकार्ड, फोटो वैगरे कागदपत्रांची दोघांमध्ये व्हॉटसॲपवरुनच देवाणघेवाण झाली. त्याआधी ११ जानेवारी रोजी योगेश याने २१५० रुपये फोन पे वरुन पाठविले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी सकाळी १०.५ वाजता योगेश याला मी इंडीयन आर्मी पोस्ट कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीचा फोन आला. तुम्ही निम्मे पैसे पाठविल्याशिवाय दुचाकी मिळणार नाही असे या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे योगेश याने एकवेळा ५ तर दुसऱ्यावेळी १० हजार रुपये फोन पे वरुन पाठविले. त्यानंतर परत त्याने सांगितल्याप्रमाणे ९ हजार ९२५ व नंतर ९ हजार १५० रुपये परत पाठविले. आणखी पैशाची मागणी झाल्याने मित्र भूषण सूर्यकांत सोनार याच्याही फोन पे वरुन ५ हजार ९९९ रुपये पाठविले असे वारंवार एकूण ५८ हजार ३७३ रुपये पाठविल्यावर आपली फसवणूक झाल्याचे योगेशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने गुरुवारी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.