लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कौटुंबिक वादातून अब्दुल रशिद मुक्तार बागवान (२१, रा. तांबापूरा) या तरुणावर नातेवाइकांनीच चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी तांबापुरातील बिस्मिल्ला चौक परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अब्दुल रशीद मुक्तार बागवान हा तरुण तांबापुरा येथे भाऊ अब्दुल मजीद व आई खतीजा यांच्यासह वास्तव्यास आहे. दोन्ही भाऊ फळ विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, अब्दुल रशिद व अब्दुल मजिद या दोन्ही भावांचे काकांशी वाद सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन्ही भाऊ घरी असताना त्यांचे काका मेहमूद बागवान, मुस्तफा बागवान तसेच मुसा बागवान यांच्यासह वाफ बागवान व इम्रान बागवान हे त्याठिकाणी आले. त्यांनी वाद घालून अब्दुल रशिद याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भावाला वाचविण्यासाठी आलेला मजिद यालाही मारहाण केली व त्याच्या आईलादेखील मारहाण केली. दरम्यान, मुसा बागवाने याने त्याच्या हातातील चाकूने अब्दुल रशिद याच्यावर वार केला. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तेथून सगळे पळून गेले. अब्दुल मजिद याने लागलीच भावाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.