ऑनलाईन लोकमत
चोपडा ,दि.8 : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंपावती नदीला पूर आला. या पुरात चहार्डी येथील तुषार गुलाबराव न्हावी (सोनवणे) (27) हा तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह सकाळी चहार्डीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापुरी बंधा:यात सापडला.
चहार्डी येथील काळकमपूरा भागातील रहिवासी गुलाबराव सुकलाल न्हावी आणि अनिता न्हावी यांचा एकुलता एक मुलगा तुषार हा 7 रोजी रात्री केश कर्तनाचा व्यावसाय आटोपून रात्री घरी जात होता. चंपावती नदी पार करत असतांना नदीला पुर आला. त्यात तो वाहून गेला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापुरी बंधा:यात अडकला होता.
रात्री वीज पुरवठा बंद असल्याने व नदीला पूर आल्याने तुषार दुकानावरच असावा असे त्याच्या आई वडिलांना वाटले. मात्र सकाळी कोल्हापुरी बंधा:यात अडकलेले लाकडे काढायला गेलेल्या इतरांच्या लक्षात ही गोष्ट आली. ही बातमी गावात वा:यासारखी पसरली. गावातील ग्रामस्थानी बंधा:याकडे धाव घेतली. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास तुषारचा मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रा.नीलम पाटील या कोल्हापुरी बंधा:याजवळ पोहचल्या. तहसीलदार दीपक गिरासे हे ही घटनास्थळी पोहचले .
4 लाखाची मिळणार मदत : तहसीलदार
दरम्यान, याबाबत पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे महसूल विभागाकडून मृत तुषार च्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले.