सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दावल बच्छाव याचे फेब्रुवारी २०१९ मध्ये भुसावळ येथील तरुणीशी लग्न झाले आहे. सहा महिन्यांपासून पत्नी माहेरीच आहे. त्यामुळे दावल हा नातेवाईक समाधान चंदन याला सोबत घेऊन दुचाकीने (एम.एच.- १२ बी.वाय.- ९२२०) भुुसावळला पत्नीला घ्यायला जाण्यासाठी रविवारी सकाळीच मूळ गावावरून निघाला. जळगाव शहरातून महामार्गाने जात असताना अजिंठा चौकाच्या अलीकडे पेट्रोलपंपाच्या जवळ समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना भुसावळकडून येणाऱ्या कंटेनरवर (डी.एन.- ०९ एम.- ९३५९) दुचाकी आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यात दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला तर पुढचे चाकही तुटून बाहेर निघाले. समाधान याच्या डोक्याला मार लागून आतील मांस बाहेर आले. त्यामुळे जागेवरच तो ठार झाला.
वाहतूक पोलिसांमुळे एकाला जीवदान
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अजिंठा चौकात ड्यूटीला असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संजीव महाले व बिपीन गढरी यांनी तातडीने धाव घेत दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी समाधान याला मृत घोषित केले तर दावल याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्या मोबाइलवरूनच महाले यांनी नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली, तेव्हा दोघांची ओळख पटली. दरम्यान, अपघातामुळे प्रचंड गर्दी झाल्याने चालकाने कंटेनर जागेवरच सोडून पलायन केले. दावल याची प्रकृती चिंताजनक असली तरी त्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.