जळगाव /पारोळा/वडजाई ता. धुळे : पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथे पिल्लूकदेव यात्रेत भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकावर एकाने गावठी पिस्तुलने गोळी झाडली. तिथून लागलीच जानवे, ता.अमळनेर गावाकडून धुळ्याकडे कारने जात असलेले राज्य कर अधिकारी विजय मगन सोनवणे (३८, रा.धुळे) यांना चौघांनी अडविले आणि पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपये रोख व सोबतच्या तिघांचे मोबाईल लुटून नेले. मंगळवारी रात्री १०.३० व ११ वाजता घडल्या. अर्ध्या तासाच्या अंतरात दोन ठिकाणी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत चारही लुटारु निष्पन्न झाले असून त्यांनी अमळनेरातून एक दुचाकी चोरली आहे. जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा,ता.पारोळा), गौरव विजय पाटील (१८, रा.अमळनेर), सागर पाटील (१९, रा.अमळनेर) व जगदीश उदय वाघ (२०, रा.सांगवी, ता.शिरपूर) अशी चौघांची नावे असून जगदीश वाघ हा या तीन जणांना पुढे जावून मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या चौघांच्या शोधासाठी पारोळा, अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची निम्मे फौज रवाना झाली आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी अमळनेरात तळ ठोकला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून जखमीचीही माहिती घेतली.चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगारगौरव, सागर व तसेच जगदीश पाटील व जगदीश वाघ हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. वाघ हा तर पंधरा दिवसापूर्वीच पोलीस कोठडीतून बाहेर आला आहे. शिरपुर पोलिसांच्या कोठडीत तो होता. तेथून सुटल्यानंतर त्याने लुटमारीचा गुन्हा केला. दरम्यान, वाघ वगळता तिघांनी अमळनेर येथून एक महागडी दुचाकी चोरी केली, त्यानंतर या दुचाकीवरुन तीन जण निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली.भांडण सोडायला जाणे पडले महागातजगदीश पाटील व यशवंत सुभाष पाटील यांच्यातील सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी चनेश्वर नथू पाटील (३०, रा. पिंपळकोठा) हा तरुण गेले असता त्याचे वाईट वाटून जगदीश याने त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तीनी वाद घातला. त्यानंतर जगदीश याने गावठी कट्ट्याने चनेश्वर यांच्या छातीवर गोळी झाडली. तसेच सोबतच्या साथीदारांनीही मारहाण करून दमदाटी केली. यात चतेश्वर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पारोळा पोलिसात खुनाचा प्रयत्न व आर्मअॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र्र ससाने, अमळनेरचे निरीक्षक अंबादास मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.दगडाने फोडला कारचा काचसागर, गौरव व दोघं जगदीश या चौघांनी रात्री ११ वाजता जानवेपासून जवळच असलेल्या डांगरगावाजवळ कर अधिकारी विजय सोनवणे यांच्या कारच्या (एम.एच.१९ बी.यु.२१४४) पुढे दोन दुचाकी आडव्या लावल्या. एकाने कारच्या खिडकीची काच खाली करायला लावून चालक दीपक कैलास नांद्रे (रा.धुळे) यांच्यावर पिस्तुल रोखला. त्यानंतर कारमधील व्यंकट गोविंद मेकाले (रा.नेरुळ, मुंबई) व अनिल वळवी (रा.रायपुर, ता.नवापुर, जि.नंदूरबार) यांनाही धमकावले. एकाने दगडाने कारची काच फोडली. या चौघांजवळील २१ हजार रुपये रोख व चार मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान, या चौघांसोबत आणखी दोन जण असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर असून उद्यापर्यंत ते हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.गोळीबारातील जखमीचे धुळ्याशी संबंधवडजाई, ता.धुळे : पिंपळकोठा या गावात यात्रोत्सवात तमाशा सुरू असताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने जखमी झालेले चेनेश्वर पाटील, रा.पिंपळकोठा हे गरताड, ता.धुळे येथील माजी पंचायत समिती सभापती सखाराम त्र्यंबक पाटील यांचे बंधू विश्वास पाटील यांचे जावई आहेत. धुळे येथील खाजगी रुग्णालयात गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले. बुधवारी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.
तरुणावर गोळी झाडून अधिकाऱ्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:11 PM