जळगाव : कोरोनाच्या संकटात रक्ताचा झरा आटत असताना शहरातील २५ तरुणी एकसोबत रक्तदानासाठी सरसावल्या व ‘हम भी किसी से कम नहीं’ चा प्रत्यय आणत त्यांनी रक्तदान केले. यामुळे कोरोना काळात रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मोठा हातभार लागला आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक जण बाहेर पडणे टाळत असून, रक्तदानाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे रक्ताची गरज भासल्यास अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे रक्ताचा मुख्य दाताच रक्तदानापासून लांब राहिल्यास रक्तपेढ्याही हतबल होतात. त्यामुळे कोरोना काळात रक्ताच्या अशा तुटवड्याच्या परिस्थितीत शहरातील फिटनेस ग्रुपच्या सदस्या असलेल्या २५ तरुणी रक्तदानासाठी पुढे आल्या.
रक्तदानातही स्त्री मागे नाही
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे. आता रक्तदानातही ती मागे नाही, याचा प्रत्यय जळगावातील तरुणींनी आणून दिला आहे. कोरोना संसर्गाची भीती व प्रतिकारशक्तीवर परिणाम तर होणार नाही, या भीतीने अनेक जण रक्तदान करण्यास धजावत नसल्याचा अनुभव सध्या शहरात येत आहे. तसे रक्तदान असो अथवा प्लाझ्मा दान असो, याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असा सल्ला दिला जातो. मात्र, तरीही अनेकांच्या मनातील भीती दूर होत नाही. रक्तदानाविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्याविषयी संदेश देणाऱ्या फिटनेस ग्रुपच्या प्रिया दारा यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले व त्यात त्यांना ग्रुपच्या २५ तरुणींनी साथ दिली. या सर्वांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीमध्ये येऊन रक्तदान केले.
तुटवड्याच्या या काळात या रक्ताचा गरजूंना लाभ होणार असून, कोणाच्यातरी आरोग्यासाठी आपण कामी येऊ शकतो, याचा आनंद असल्याची भावना यावेळी या रक्तदात्या तरुणींनी व्यक्त केली.
रक्तदान करीत साईन बोर्डवर सर्व तरुणींनी स्वाक्षरी करीत रक्तदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गणी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, उज्ज्वला वर्मा आदींची उपस्थिती होती.
यांनी केले रक्तदान
प्रिया दारा, सिमरन किंजरानी, हर्षा हेमनाणी, नीतू रावलानी, दीपिका चांदीरामानी, मयुरी वालरेचा, सुमन काटफल, विनिता कुकरेजा, श्वेता बजाज, रवी नाथानी, राधिका चांदीरामानी, सिमरन चावला, स्वाती काटफल, नीतू बजाज, नेहा चावला, काजल हेमनाणी, स्वाती मंजानी, राम जेवलानी, दिव्या गेरडा, भूमी दर्डा, सेजल किंजरानी, हिना किंजरानी, पंकज काटफल, तेजस बागूल, निखिल सैंदाणे, साजन दारा, मोहित दारा, राहुल ठेरानी, कृष्ण हेमनाणी.
फोटो कॅप्शन -
एकसोबत रक्तदान करणाऱ्या तरुणींसोबत विनोद बियाणी, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, गणी मेमन, उज्ज्वला वर्मा व अन्य.