सुनील पाटील
जळगाव : विरुध्द दिशेने वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, नो हेल्मेट, सिग्नल तोडणे आदी कारणास्तव वाहनचालकांवर ऑनलाईन दंड ठोठावला जातो. मात्र, आपल्या वाहनावर दंड आहे, हे अनेकांना हे माहीतच नसते. आता मात्र आपल्या गाडीवर काही दंड आहे का, हे पाहण्यासाठी पोलीस दलाने महाट्राफिकॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपवर गेल्यावर दंड कळतोच, मात्र चुकीचा दंड आकारला तर तक्रार करण्याची सुविधादेखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सहा प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. केसेस, चलन, चुकीचे चलन, अपघाताची माहिती कळविण्यासह कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्याचा फोटाे काढून या ॲपवर अपलोड करता येऊ शकतो.
एक कोटीचा दंड येणे बाकी
जळगाव शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईपोटी जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीत वाहनधारकांकडून १ कोटी ९ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा दंड येणे बाकी आहे. या कालावधीत २९ हजार ८५७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली, तर त्यांना १ कोटी २५ लाख १ हजार २०० रुपये इतका दंड आकारण्यात आला. आतापर्यंत ६ हजार ६९४ वाहनधारकांकडून १५ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या ३ हजार ३४२, तर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ११ हजार ८९६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या २५ प्रकारात पोलिसांनी या कारवाया केलेल्या आहेत.
भरधाव वेगाने वाहन चालविणे -३,३४२
हेल्मेट नाही-११,८९६
नो पार्किंग-१,८८३
सीट बेल्टचा वापर न करणे-२,७८६
वाहनावर दंड आहे का? या ॲपवर शोधा !
सर्वात आधी प्रत्येक वाहनधारकाने आपल्या मोबाईलमध्ये महाट्राफिक ॲप सुरु करणे आवश्यक आहे. या ॲपवर गेल्यावर डॅशबोर्डवर सहा फिचर्स दिसतात. त्यात माय ई चलन, माय व्हेईकल, सिव्हीलियेन रिपोर्ट, पे ई चलन, ग्रेव्हीएन्स चलन व अपघाताच्या फिचर्सचा समावेश आहे. आपल्या वाहनावरील दंड पाहण्यासाठी माय व्हेईकल चिन्हावर क्लिक करावे. त्यात वाहनाचा क्रमांक टाकावा. तेथे वाहनाची नोंदणी होते, त्यानंतर चेचीसच्या शेवटचे चार क्रमांक टाकावेत. त्यानंतर आपल्या वाहनावर किती दंड आहे, ते दिसते. सोबत वाहनाचा फोटोही असतो.
कोट..
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईत सुसूत्रता आणण्यासाठी वाहन चालकावर डिजिटल चलनाद्वारे एक राज्य एक चलन योजना सुरु झाली, त्यानंतर आता महाट्राफिकॲप सुरु करण्यात आले आहे. नागरिक घरी बसूनदेखील हे चलन भरु शकतात. चुकीचे चलन असेल तर त्याचीही तक्रार करु शकतात.
- लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा