जळगाव : मुंबईला जाण्यासाठी परिवाराचे रेल्वेचे तिकिट काढायला जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या भूषण मधुकर लोखंडे (वय २७, रा.भादली बु. ता. जळगाव) या तरुणाने हुतात्मा एक्सप्रेसखाली भादली रेल्वेगेटजवळ आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूषण हा मुंबई येथे रेल्वेत कंत्राटी पध्दतीने नोकरीवर आहे. आई, वडील, पत्नी व मुलासह तो मुंबईतच स्थायिक झाला होता. भादली येथील घर भाड्याने देण्यासाठी भूषण हा परिवारासह गेल्या आठवड्यात घरी आला होता.रविवारी घर स्वच्छ करुन त्यातील सामान मुंबई नेण्यासाठी त्याने शहरातील एका ट्रॅव्हल्सकडे कुरीअर केले. सामान घेऊन जाणारी रिक्षा परत आली मात्र, भूषण परत आला नव्हता.सामान कुरीअर केल्यानंतर सर्वांचे रेल्वेचे तिकिट काढून येतो, हुतात्मा एक्सप्रेसच्यावेळी तुम्ही जळगाव रेल्वे स्टेशनला या म्हणून त्याने घरी सांगितले होते.सकाळी मृत्यूचाच निरोप आलाभूषण तिकिट काढायला गेला आहे, मात्र अजून का येत नाही म्हणून कुटुंबाने त्याची चौकशी केली असता तो रात्री आठ वाजता एका मित्राकडून जेवण करुन परत गेल्याचे समजले. नंतर त्याचा मोबाईलही बंद झाला होता. इकडे हुतात्मा एक्सप्रेसची वेळ झालेली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन तपास न लागल्याने सर्व जण झोपून गेले.सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांचाच फोन आला. कुटुंबाने रुग्णालयात जावून पाहणी केली असता तो मृतदेह भूषणचाच असल्याची खात्री झाल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला.भूषणचा प्रेमविवाह..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण याचा तीन वर्षापूर्वी घरासमोरच राहणाऱ्या दीपालीशी प्रेमविवाह झालेला होता. या विवाहाला दीपालीच्या कुटुंबाचा विरोध होता. रेल्वेत नोकरी लागल्याने तो कुटुंबासह पाच महिन्यापासून मुंबईत स्थायिक झाला होता. पत्नी दीपाली व भूषण यांच्यात वादही सुरु होते. यापूर्वी पोलिसांसमक्ष लेखी हमी देऊन दीपाली नांदायला आली होती. आता पुन्हा त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे ती माहेरीच राहत होती. त्यातूनच भूषण याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, भूषण याची नेमकी आत्महत्या आहे की घातपात, की अपघात हे सांगता येणार नाही हा प्रकार संशयास्पदच असल्याची माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली. दुपारी दोन वाजता भादली येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा हिमांशु (वय १ वर्ष ३ महिने),आई शालुबाई, वडील मधुकर लोखंडे, भाऊ सुनील, भावजयी जयश्री असा परिवार आहे.भूषण लोखंडे याने आत्महत्या केल्याची वार्ता गावात येताच ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या घरासमोर गर्दी झाली होती.मोबाईलमधील सीमकार्ड काढून वडीलानाच फोन४हुतात्मा एक्सप्रेसखाली एका तरुणाने रात्री १२.२२ ते १२.५३ या वेळेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खांब क्र.४२२/२८ जवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. सोमवारी सकाळी त्याच्याजवळील मोबाईलमधील सीम कार्ड काढून त्यांच्या मोबाईलमध्ये टाकले. त्यातील बाबा या क्रमांकावर फोन केला असता तो भूषण याचे वडील मधुकर निवृत्ती लोखंडे यांना लागला. त्यानंतर कुटुबिय जिल्हा सामाय रुग्णालय आले.यावेळी रूग्णालयात एकच गर्दी केली होती.
जळगाव तालुक्यातील भादली येथील तरुणाची हुतात्मा एक्सप्रेसखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:04 PM
घातपाताचा संशय
ठळक मुद्देपती-पत्नीत सुरु होता वादमोबाईलमधील सीमकार्ड काढून वडीलानाच फोन