जळगाव : गेंदालाल मिलमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय अशोक पाटील (२८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली.
विजय हा अविवाहित होता. हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आई घरात काम करीत असताना वरच्या मजल्यावर जाऊन येतो, असे सांगून तो वरच्या मजल्यावर गेला, मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो खाली न आल्याने आई पुष्पा त्याला बोलवायला गेली असता आतून दरवाजा बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले तर विजय याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे आईने जागेवरच हंबरडा फोडला. भाऊ व इतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजय लहान असतानाच वडिलांचे निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात आई पुष्पा, भाऊ संतोष व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.