जळगाव : बाहेरून मुलांना शीतपेय आणून दिले. त्यांनी ते सेवन केले. त्यानंतर, दोन्ही मुले व पत्नी बाहेर गल्लीत महिलांसोबत गप्पा करीत असताना, वरच्या मजल्यावर गेलेल्या संजय मुधलदास चिमरानी (वय ३५) यांनी पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री सिंधी कॉलनीतील बाबानगरात १२.३० वाजता उघडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय चिमरानी यांचा फुले मार्केटमध्ये हातगाडीवर रेडिमेड कपडे विक्रीचा व्यवसाय होता. स्वत:च्या मालकीचे दुकान नसल्याने ते अतिक्रमणात हातगाडी लावत होते. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात त्यांनी व्यवसायासाठी इतरांकडून कर्ज घेतल्याने त्यांचाही तगादा सुरू होता. हा ससेमिरा सुरू असतानाच, मनपाकडून वारंवार कारवाई होऊन कधी दंड तर कधी माल जप्त केला जात होता. त्यामुळे ते प्रचंड नैराश्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी ‘लोकमत’ला दिली.
शुक्रवारी रात्री संजय यांनी कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर, मुले दक्ष व लक्ष यांनी त्यांना शीतपेय मागितली. बाहेरून त्यांनी ती आणून मुलांना दिली. अकरा वाजण्याच्या दरम्यान, पत्नी कांचन व मुले बाहेर गल्लीत इतर महिलांशी गप्पा करीत होते. १२.३० वाजता जेव्हा घरी वरच्या मजल्यावर पत्नी गेली असता, पतीने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृश्य पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. खालच्या मजल्यावर राहणारे भाऊ कमलेश यांनी धाव घेतली. माजी नगरसेवक अशोक मंधान व सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.