फैजपूर, ता. यावल : यावल तालुक्यातील वड्री धरणात बुडत असलेल्या एका तरुणाला फैजपूर येथील सौरभ वाणी या युवकाने धाडसाने पाण्यात उडी मारून वाचवले .रविवारी सुटीचा दिवस असल्याने सावखेडासीम, ता.यावल येथील फिरोज वसीम खाटीक (२३) आणि त्याचा मोठा भाऊ मोहसीन खाटीक हे वड्री धरणात पोहायला गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने फिरोज वसीम खाटीक रा.सावखेडासीम हा युवक बुडाला. मात्र त्याच्यासोबत असलेला त्याचा मोठा भाऊ मोहसीन खाटीक हादेखील बुडत असल्याचे पाहून फैजपूर येथील सौरभ संजय वाणी या युवकाने धाडस करून मोहसीन खाटीक यास वाचवण्यात यश आले.सौरभ संजय वाणी व त्याचे मित्र वड्री धरणावर फिरायला गेले होते. यावेळी घटना घडताना बुडत असलेल्या युवकाला वाचवले. मात्र बुडालेल्या दुसऱ्या युवकाला वाचवू शकलो नसल्याची खंत सौरभ वाणी याने व्यक्त केली. सौरभच्या या धाडसाचे कौतुक करून सतपंथ देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी त्याचा सत्कार केला.दरम्यान, फैजपूर येथील सोशल मीडिया व्हाट्सएप ग्रुपवर सौरभ वाणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सौरभ वाणी हा फैजपूर येथील नामांकित गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय वाणी यांचा मुलगा आहे.
धरणात बुडणाऱ्या एका तरुणाला फैजपूरच्या तरुणाने वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 16:21 IST