पहूर, ता.जामनेर : कसबे ग्रामपंचायतीमध्ये कायद्याचे उल्लंघन होऊन विकासकामांच्या व्यवहारात अपारदर्शकता दिसून येत आहे. याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी उपोषणाला बसलेले विक्रम पंडित घोंगडे यांनी केली.कसबे ग्रामपंचायतीत सत्ताधारी ग्रामस्थांना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष ठराव न करता मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत.भ्रष्टाचारासंबंधी तहसीलदार व शासकीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष तसेच पोलीस अधीक्षक यांनाही माहिती दिली आहे. मात्र संबितांविरूध्द कारवाई न झाल्याने उपोषणाला बसल्याचे घोंगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.याबाबत सरपंच ज्योती घोंगडे यांना विचारले असता, माझे पती शंकर घोंगडे हे स्पतशृंगी पतसंस्थेचे व्यवस्थापक असून त्या ठिकाणी उपोषणकर्त्याने पैशांचा अपहार केला आहे. त्यामुळे त्यांच्या नावे कर्ज आहे. याचा वचपा घेण्यासाठी संबंधित व्यक्ती उपोषणाला बसली असून केलेले आरोप तथ्यहीन आहेत. दरवर्षी ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण केले जाते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.