लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील निंब या गावामध्ये बिहार पॅटर्नअंतर्गत पाच हजार झाडे लावली जात असून, पावसाने धोका दिला असला तरी तरुणाई जिद्दीला पेटली आहे. टँकरने पाणी टाकून झाडे जगवली जात आहेत. विशेष म्हणजे सर्व झाडे निंबाची लावली जात असल्याने भविष्यात लिंबाच्या झाडांचे गाव म्हणून 'निंब' गावाचे नाव सार्थक ठरणार आहे.
२०२०ते २१ या वर्षी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून दोन हजार लिंब झाडांचे संवर्धन व संगोपन व रक्षण करून झाडे जगवली आहेत. त्याच्या माध्यमातून मागील वर्षांत ४० लोकांना रोजगार मिळाला आहे. यावर्षी मागील वर्षीचा बिहार पॅटर्न योजनेचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बिहार पॅटर्न वृक्षलागवडीच्या माध्यमातून पाच हजार कडू लिंब वृक्षाची वृक्षलागवड करण्यात येत आहे.
यंदा अमळनेर तालुक्यात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात आहे. हजारो हेक्टर पिके धोक्यात आहेत, अशी बिकट अवस्था असतानासुद्धा निंब (निम ) गावातील पानी फाउंडेशनच्या चळवळीमध्ये काम करणारे अनेक 'वाॅटर हिरो' टॅंकरच्या माध्यमातून पाणी घालून वृक्षलागवड करत आहेत. त्याचबरोबर या गावातील युवक तरुण मोठ्या प्रमाणात या वृक्षलागवडीच्या चळवळीकडे जिद्दीने मैदानामध्ये उतरले आहेत. या पाच हजार वृक्षांच्या माध्यमातून गावातील गरजू व कष्टकरी युवक कष्टकरी मजूर अशा १०० बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
बिहार पॅटर्न योजनेच्या माध्यमातून हजारो वृक्ष तर जगवले जाणारच. त्याचबरोबर या दुष्काळी परिस्थितीत लाखो रुपयांची आर्थिक समृद्धीही या वृक्षमित्रांना प्राप्त होणार आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात या मजूर बांधवांच्या हातून होणार आहे.
चळवळीमध्ये काम करणाऱ्या ध्येयवेड्या वृक्षप्रेमी यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, पानी फाउंडेशन, सामाजिक वनीकरण या विभागाचे सहकार्य लाभले आहे.