शाम जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, चोपडा : कामानिमित्त अमळनेर येथे गेलेले तिशीच्या आतील वयाचे तीन तरुण शनिवारी रात्री दहिवदजवळ मोटरसायकल टॅक्सीवर आदळल्याने मृत्युमुखी पडले. यांतील दोनजण केटरर्सचे काम करून परिवाराचा रहाटगाडा चालवत होते. या कमावत्या तरुणांचीच धडधड थांबल्याने आता या तिघाही परिवारांसमोर जगण्याचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तीनही तरुणांवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभम ओंकार पारधी (२१, रा. सुंदरगढी, चोपडा), विजय बाळू पाटील (२८, रा. गुजरअळी, चोपडा) आणि केवाराम पावरा (२५. रा. चोपड़ा) अशी त्यांची नावे आहेत. यापैकी शुभम व विजय यांच्यावर दुपारी चोपडा येथे, तर केवाराम पावरा याच्यावर त्याच्या गावी धुपे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विधवा आईचा आधार गेला!
शुभम हा अविवाहित होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने हाताला मिळेल ते काम करून विधवा आई आणि भाऊ यांना परिवाराचा रहाटगाडा चालवण्यासाठी तो मदत करायचा. त्याचाच एक भाग म्हणून तो शनिवारी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे लग्नात वाढपी म्हणून गेला होता.
धुपे गावावर शोककळा तिसरा केवाराम पावरा हा चोपडा तालुक्यातील गाडऱ्या जामन्या जवळील धुपे या गावचा रहिवासी आहे. तो चोपडा शहरातील गरताड रोडवरील आदिवासी वसतिगृहात वास्तव्यास होता.
मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याआधीच..
विजय पाटील हा विवाहित आहे. त्याला एक लहान मुलगा आहे. या बालकाचा येत्या १६ तारखेला पहिला वाढदिवस होता. विजयने मुलाचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचे मित्रांजवळ बोलून दाखवले होते. विजय हा आधी दुसरीकडे मजुरीने कॅटरिंगचे काम करत होता. मात्र अलीकडेच त्याने स्वतःच कामे घ्यायला सुरुवात केली होती. शनिवारी मंगरूळ येथील लग्नासाठी त्याने चोपडा येथून २५ मुले अमळनेर येथे नेली होती. २० मुले दुसऱ्या वाहनाने चोपड्याकडे रवाना केली. इतर पाचजण दोन दुचाकींनी चोपडा येथे परतत असताना त्यांचा दहीवदनजीक अपघात झाला.