लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकात नुकत्याच पार पडल्या. त्यात तरुणांचा चांगलाच बोलबाला राहिला. नांद्रा येथील तरुणीसह अनेक ठिकाणी पंचविशीतील तरुणांनी बाजी मारत ग्रामपंचायत आपल्या हाती राखली आहे.
तरुण उमेदवारांनी प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यामुळे बहुतांश मतदार तरुण उमेदवारांकडे आकर्षित झाले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये तरुण उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्याचा फायदा गावाच्या विकासाला नक्कीच होऊ शकतो, अशी आशा गावातील मतदारांना वाटते. बहुतांश मतदारदेखील तरुण आहे. गावाच्या विकासात ते मोठी भूमिका बजावतील, या आशेवर तरुण मतदार आता गावातील तरुण उमेदवारालाच निवडून देतात
ममुराबाद, वडलीत तरुणांना संधी
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. त्यात काही प्रभागांमध्ये तरुण उमेदवारांनी ज्येष्ठ उमेदवारांचा पराभव केला. ममुराबादला बहुतांश तरुण उमेदवार आहेत. त्यासोबतच कुसुंबा, रायपूर म्हसावद येथेदेखील तरुण उमेदवारांनाच संधी मिळाली आहे. वडलीत तर एकही ज्येष्ठ उमेदवार नाही.
उमेदवारांचे व्हिजन
गावातील व्यायामशाळेच्या प्रश्नाकडे युवा सदस्यांचे विशेष लक्ष आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे करून देण्याकडे उमेदवारांचा कल आहे. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर आता गावातील शौचालयांचा प्रश्न, पाणी पुरवठा यासोबतच विविध समस्या सोडवणे हे उमेदवारांचे व्हिजन आहे.
कोट -
गावात तरुण उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही आता विकासाकडे लक्ष देणार आहोत. गावातील तरुणांना गावातच व्यायामशाळा उभारणे, त्यासोबत पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देऊ. गावात स्वच्छता राहील यासाठी प्रयत्न करणार - मनीषा पाटील.
आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आता आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. गावात सुसज्ज व्यायामशाळा उभारणीकडे आमचा कल आहे. त्यासोबतच तरुणांचे विविध प्रश्न आम्ही सोडवू, त्यातून गावाचा विकास साधणार आहोत. - विशाल नन्नवरे
आमची झालेली निवड, हा ग्रामस्थांनी युवकांवर टाकलेला विश्वास आहे. त्यामुळे आता आम्ही नक्कीच गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू. ही जबाबदारी नक्कीच पूर्ण करणार - विकास बोरसे.