सुनील पाटील
जळगाव : कोणतेही व्यसन हे वाईटच असते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. बीएचआर घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील झंवर यालाही सिगारेटचे व्यसन अर्थात तलफच घातक ठरली. सिगारेटचा झुरका ओढण्यासाठी तो गॅलरीत आला आणि पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला कॅमेऱ्यात कैद केले. तो झंवरच आहे का? याची खात्री करण्यासाठी फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर फोकस केला. सकाळी १० वाजता घरातून बाहेर निघाल्यावर कारमध्ये बसण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावर झडप घातली. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलोच याची पक्की खात्री पटताच झंवर गार झाला.
पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २६ रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके व तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले १३५ जणांचा ताफा घेऊन जळगावात धडकले होते. त्यादिवशीच जितेंद्र कंडारे व सुनील झंवर एकाच वेळी जळगावातून निसटले. २६ नोव्हेंबर ते १० ऑगस्ट २०२१ असे २५८ दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. दोन वेळा तो थोड्या मिनिटासाठी निसटला होता. दरम्यानच्या काळात त्याने पुणे सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला, मात्र त्याला दिलासा मिळालाच नाही. त्यामुळे त्याची भागमभाग सुरुच होती.
मोबाईल सीम बदलले अन् घात झाला
सुनील झंवर हा सतत अहमदाबाद, इंदूर व उज्जैन असाच फिरत होता. या काळात त्याने आपला संपर्क कोणाशीच येणार नाही, खास करुन मोबाईलमुळे पकडले जाणार नाही याची काळजी घेतली. अशातच सध्या वापरत असलेल्या मोबाईलमधील सीम कार्ड जुन्या मोबाईलमध्ये टाकले अन् त्याचे तात्काळ लोकेशन पोलिसांना मिळाले. त्यामुळे वेळ वाया न घालवता त्याच्या मागावर असलेले उपनिरीक्षक रवींद्र गवारी व पोलीस नाईक शिरीष गावडे यांना ही माहिती कळविण्यात आली. या दोघांनी अगदी जुनी चारचाकी घेतली आणि उज्जैन गाठले. तेथून तो नाशिकला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे अटक करण्याची घाई केली नाही. त्याच्या वाहनाच्याच मागे त्यांचे वाहन लावले. थेट ४७२ कि.मी. प्रवास करुन रात्री २.३० वाजता झंवर नाशिक येथे पोहचला. तो ज्या घरी गेला त्या घराच्या बाहेर पोलिसांनी रात्रभर पहारा दिला. सकाळी १० वाजता सिगारेटचा झुरका घेण्यासाठी गॅलरीत आला आणि तेव्हाच त्याला पोलिसांनी कैद केले. यावेळी पंचवटी पोलिसांची मदत घेण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री १० वाजता त्याला पुण्यात आणण्यात आले.