जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणुकीला अजून अवधी असला तरी जळगावात ठाकरे गट व शिंदे गटात आतापासूनच राजकीय शिमगा रंगला आहे. जे लोक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघता लोकांशी चर्चेला जात आहेत. त्यांनी आधी आपले कर्तृत्व तपासावे, मगच लोकांशी चर्चा करावी अशी टीका शिंदे गटाचे माजी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी ठाकरे गटावर केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सरकारचा पंचनामा करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य करुन जळगाव ग्रामीण मतदार संघात 'होऊ द्या चर्चा' हे अभियान हाती घेतले आहे. त्यावरुन आता राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे तर पक्षात कामाला आहेत असेच वाटते. कारण कर्तृत्व शून्य आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी काय केले कोणी सांगितले तर बरं होईल. जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांनी तर संन्यास घ्यायला हवा. २५ वर्षे झाली, प्रयत्न करुन तरी देखील ते आहे त्याच जागेवरच आहेत. मागचे कार्यकर्ते पुढे चाललेत.
पक्ष आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून काय ठोस काम केले ते सांगावे. राहिले सुनील महाजन यांनी मागच्या १५ वर्षांत जळगाव शहरात विकासाचे कोणते पूल बांधले. आताच मेहरुण व तांबापुरा पुरात वाहून चालले होते. हा भाग महाजन यांच्याच मतदारसंघातला आहे. हा अत्यंत गंभीर आभ्यासाचा विषय आहे, त्यामुळे ‘होऊ द्या चर्चा’ यात प्रथम गावकऱ्यांनी हे विषय समजून घ्यावेत. जे लोक चर्चेला म्हणजे गैरसमज पसरविण्यासाठी येतील त्यांची आधी पात्रतेची तपासणी करावी अशी टीका ॲड. पोकळे यांनी केली आहे. ये पब्लिक है सब जानती है’ असेही ते म्हणाले. ठाकरे गटाच्या अभियानाला सुरुवात झालेली आहे. ९ ऑक्टोबरला अभियानाचा समारोप आसोदा येथे होणार आहे.
जे लोक चर्चेला जाणार आहेत, त्यांना खरोखरच विकासकामांसाठी चर्चा करण्याचा अधिकार आहे का?. उगाचच गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चर्चेला जाणाऱ्यांनी प्रथम आपली पात्रता तपासावी.‘ये पब्लिक है सब जानती है’-ॲड. दिलीप पोकळे, माजी नगरसेवक तथा महानगर संघटन प्रमुख शिंदे गट
आम्ही अजून कोणावरही बोललेलो नाही, त्यामुळे चेले, चपाटे व पंटरांनी यात पडू नये. उगाचच स्वत:चे महत्व वाढवू नये. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. मतदार संघात कोणी काय दिवे लावले हे जनतेला माहिती आहे. भविष्यातही नेत्यांमध्येच सामना रंगणार आहे.-सुनील महाजन, माजी विरोधी पक्ष नेते, महानगरपालिका