लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून तीन कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागातील दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनचालकांचा कोरोना अहवाल गुरूवारीच बाधित आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कोरेानाची लागण झाली होती. यात अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात तीन कर्मचारी बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने काही निर्बंध लावले होते. त्यात मुख्य गेट बंद करून छोट्या गेटमधून सर्वांना प्रवेश दिला जात होता. शिवाय नोंदणी व तपासणी बंधनकारक केली होती. विना मास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. काही दिवस ही कारवाई झाली. दरम्यान, आता पुन्हा कोरोनाने जि. प.त डोके वर काढले आहे. दरम्यान, सीईओंचे वाहन चालक बाधित आढळल्यानंतर आता त्यांचीही कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती आहे.