लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून महापौरपद मिळवले तसेच जिल्हा परिषदेतदेखील भाजपला खाली खेचून तेथे महाविकास आघाडीचा झेंडा लावावा, अशी आग्रही मागणी असणाऱ्या काही कार्यकर्त्यांची शुक्रवारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत भाजपच्या नेत्यांची एकाधिकारशाही असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जरी आता कार्यकाळ कमी शिल्लक असला तरी तेथे सत्तांतर करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. जि. प. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. त्याबाबतदेखील या बैठकीत चर्चा झाली. तसेच जामनेरला बीओटी तत्त्वावर बांधलेल्या व्यापारी संकुलाबाबत होत असलेल्या आरोपांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजपचे काही नेते जिल्हा परिषदेत मनमानी करत असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या बैठकीला माजी आमदार गुरूमुख जगवाणी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जि.प.चे उपगटनेते रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेने गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे प्रभाकर पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनील माळी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख पदाधिकारीच खडसे गटाचे ?
जिल्हा परिषदेत भाजपचे एकूण सदस्य ३३ आहेत. त्यापैकी प्रमुख पदाधिकारी हेच एकनाथ खडसे यांना मानणारे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खडसे यांना मानणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजून भाजप सोडलेला नाही. जिल्हा परिषदेत भाजपचे ३३ सदस्य आहेत तर त्यापैकी ९ सदस्य हे एकनाथ खडसे यांना मानणारे आहेत. सध्या जि.प.मध्ये १६ राष्ट्रवादीचे, १४ शिवसेनेचे आणि ४ काँग्रेसचे सदस्य आहेत.
निवडणुकीला फक्त आठ महिन्यांचा कालावधी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आता फक्त सहा ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे काही सदस्य हे आताच सत्तांतर का करावे, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. सहा महिन्यांनी निवडणुका लागणार आहेत. मात्र जि.प.च्या बाहेर असलेल्या पण भाजप सोडलेले कार्यकर्ते मात्र जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे वजन कमी करण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.