जळगाव : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यासह अवैध दारु विक्रीदेखील वाढू लागल्याचे कारवाईवरून समोर येत आहे. कारवाई होत असली तरी एक मात्र निश्चित ते म्हणजे निवडणुकीच्या वाढत्या धामधुमीत अवैध दारुची विक्रीदेखील वाढून निवडणुकीत ‘झिंग’ही वाढत आहे.निडणूक कोणतीही असो, त्यात मद्याला मोठी मागणी असल्याचे दिसून येते. आतादेखील तेच चित्र असून सध्या जिल्ह्यात अवैध दारु विक्री वाढली असल्याचे चित्र आहे. या सोबतच आचारसंहिता भंग, रोख रक्कम जप्तच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १११ जणांविरुद्ध तर रावेर मतदार संघात ८५ जणांविरुद्ध अवैध दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव व रावेर मतदारसंघात केलेल्या कारवाईत सर्वाधिक हातभट्टीची दारु हाती लागली आहे. दोन्ही मतदार संघात मिळून ३ हजार ३० लीटर हातभट्टीची दारु कारवाईदरम्यान आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा प्रशासनास दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव मतदार संघात एकूण १११ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या ३८ जणांना अटक करण्यात आले आहे. या मतदार संघात दोन हजार १६० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर ६२ हजार ४२० लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच ८२.८८ लीटर देशी दारु, ५.४ लीटर विदेशी, ३० लीटर बिअर व इतर असे एकूण ५०५ लीटर मद्य व साहित्य कारवाई दरम्यान पथकाने जप्त केले आहे. रावेर मतदार एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या २३ जणांना अटक करण्यात आले आहे. या मतदारसंघात ८७० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर २९ हजार ८१६ लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच २६.०४ लीटर देशी दारु, ५३.४१ लीटर विदेशी, २५ लीटर बिअर पथकाने जप्त केली आहे. ही कारवाई म्हणजे दारुला मागणी वाढत असल्याचे स्पष्ट करते.
निवडणुकीत वाढती ‘झिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:51 PM