जळगाव : जिल्हा प्रिषदेचे सभापतीपद आपल्या मर्जीतल्या सदस्यांना मिळावे यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात शनिवारी जोरदार रस्सीखेच झाली. अखेर महाजन गटाचे चारही सभापती होतील, असे संकेत मिळाल्यानंतर खडसे गटाचे 13 सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले. यातच जि.प.सभागृहात संख्याबळासाठी महाजन गटाने भाजपाचे 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य आपल्या बाजूने करीत खडसे गटावर दबाव आणला. त्यामुळे खडसे गट बॅकफूटवर गेला आणि अखेर सभापतीपदी महाजन गटाच्या चारही सदस्यांची नियुक्ती झाली. त्यात काँग्रेसच्या वाटय़ालाही सभापतीपद देण्यात आले आहे. सभापतीपदाची निवड शनिवारी दुपारी 3 वाजता जि.प.मध्ये विशेष सभेत करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी 10.40 वाजता जलसंपदामंत्री शासकीय विश्रामगृहात चर्चेसाठी दाखल झाले. नंतर एकनाथराव खडसे व इतर भाजपाचे नेते आले. यात खडसेंनी सभापतीपदासाठी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी.पाटील यांची पत्नी काँग्रेसच्या अरुणा पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला. पण महाजन यांनी अरुणा पाटील यांच्याऐवजी दिलीप युवराज पाटील यांना सभापतीपद दिले जावे, अशी भूमिका मांडली. खडसे मात्र त्यावर सहमत झाले नाही. सभागृहात मतदान झाल्यास मदत व्हावी यासाठी भाजपातर्फे राष्ट्रवादीचे आत्माराम कोळी व मिना रमेश पाटील यांना बोलावण्यात आले. तसेच शिवसेनेचे तीन सदस्य सभागृहात उपस्थित राहणार असल्याचे खडसे गटास कळले. त्यामुळे खडसे गटाने माघार घेतली व खडसे गटाचे सर्व 13 सदस्य शेवटी जि.प.सभागृहात सभापती निवड सभेला दुपारी 3 वाजता दाखल झाले. महाजन गटाचे चौघे सभापतीजि.प.सभापतीपदी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील रजनी जगन्नाथ चव्हाण, प्रभाकर गोटू सोनवणे व पोपट भोळे यांची बिनविरोध निवड झाली. तर काँग्रेसचे दिलीप युवराज पाटील यांनाही महाजन यांच्या पुढाकाराने जि.प.मध्ये सभापतीपद मिळाले.
जि.प. सभापतीपदासाठी खडसे व महाजन यांच्यात जोरदार रस्सीखेच
By admin | Published: April 01, 2017 7:54 PM