जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोसळला. सुदैवाने वर्गातील सर्व विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर पटांगणात असल्याने अनर्थ टळला. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे.वाकडी येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या इमारतीत दोन वर्ग खोल्या असून, एका स्लॅबची खोली तर दुसरी पत्र्याची आहे. दुसऱ्या स्लॅबच्या खोलीचे बांधकाम सुमारे ५० वर्षांपूर्वीचे असून, जीर्णावस्थेतील खोली धोकादायक होती. स्लॅब केव्हाही पडू शकतो, याची दक्षता घेण्याबाबत पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती.मध्यंतरी गेल्या वर्षी पंचायत समितीच्या अभियंत्याने या जीर्ण खोलीची पाहणी केल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून एकूण ५८ विद्यार्थी शिक्षण घेतात. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.वाकडी जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील वर्ग खोली जीर्ण झाली असून, तातडीने नवीन बांधकाम करून मिळावे. पावसाळ्याचे दिवस असून, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. -रियाज खान, मुख्याध्यापक, जि.प.उर्दू शाळा, वाकडीवाकडी शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळाली. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांची पर्यायी जागेत तात्पुरती व्यवस्था करावी. केंद्रप्रमुखांसोबत वाकडीला भेट देवून माहिती घेणार आहे. -आदिनाथ वाडकर, गटशिक्षणाधिकारी, जामनेर
जि.प. उर्दू शाळेचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:19 AM