मुंबई : मोनो ठप्प झाली, आणि प्रवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला मोनोरेलच्या ट्रॅकखालील रस्तेवाहतूक संथ केली. उंच शिडीचा आधार घेत शिडी मोनोच्या फ्रंटसाईड डोअरपर्यंत पोहोचविली. दरम्यानच्या काळात मोनोमधील प्रवाशांना ‘घाबरू नका तुम्ही सुखरूप आहात,’ अशी घोषणा सातत्याने करण्यात येत होती. ‘मोनोमधून तुम्हाला लवकरच बाहेर काढण्यात येणार आहे,’ असेही सांगण्यात येत होते. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत १० प्रवाशांसह कॅप्टनला उंच शिडीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एमएमआरडीएच्या सांगण्यानुसार, खोळंबलेल्या मोनोमधील प्रवाशांसह चालकांना बचाव कार्यादरम्यान सुखरूप बाहेर काढले. दुपारी १२नंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आणून त्यानंतर मोनोरेल नियमित धावू लागली.खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळाचा आढावा घेत नाराजी प्रकट केली. अशा घटना घडल्यानंतर एमएमआरडीए असो वा प्रकल्पाशी संबंधित खासगी कंपनी आपत्कालीन सेवा पुरविण्यात अयशस्वी झाल्याची टीका केली.(प्रतिनिधी)
१० प्रवाशांचा जीव टांगणीला!
By admin | Published: March 16, 2015 3:19 AM