बऱ्याचदा काही मुलं आपल्या लहान वयातचं अशी काही कामं करतात जी ऐकून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. असंच काहीसं काम अवघ्या 10 वर्षाच्या मुलानं केलं आहे. त्याच्या या कौशल्याने फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. जालंधरमध्ये राहणाऱ्या या छोट्या मुलाने वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
या फोटोबाबत सांगताना अर्शदीपने सांगितले की, त्याने हा फोटो पंजाबमधील कपूरथलामध्ये काढला होता. तो आपल्या बाबांसोबत तेथून जात असताना त्याने दोन घुबड उडत जाऊन एका पाईपमध्ये गेल्याचे पाहिले. त्याने लगेच वडिलांना सांगून ते बाहेर येण्याची वाट पाहूयात असे सांगितले. परंतु ते बाहर येतील की नाही ते माहिती नव्हते त्यांनी तिथेच गाडी थांबवून वाट पाहण्याचा निर्णय घेतला. जवळपास अर्धा तास वाट पाहिल्यानंतर पाईपमध्ये गेलेली दोन्ही घुबड बाहेर आली आणि त्याने हा फोटो काढला.
या फोटोला पुरस्कार जाहीर करताना नॅचरल हिस्ट्री म्यूझिअमने सांगितले की, 'आपल्या आवडीप्रती असलेली उत्सुकता आणि निरिक्षण यांमुळेच अर्शदिपला ही घुबडांची जोडी दिसली. त्याने थोडासा धीर धरला आणि हा विनिंग शॉर्ट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.' अर्शदीप आपल्या फेसबुक हॅन्डलवरून त्याने काढलेले फोटो पोस्ट करत असतो. आतापर्यंत त्याने अनेक विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत.