नेदरलँडमधील एका डच इतिहासकाराला एक हजार वर्षे जुना मध्ययुगीन सोन्याचा खजिना सापडला आहे. या खजिन्यामध्ये चार सोनेरी कानातील पेंडेंट, सोन्याची पानं असलेल्या दोन पट्ट्या आणि ३९ चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती नॅशनल म्युझियम ऑफ अँटिक्विटीजने दिली आहे. म्युझियमच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये लागलेल्या या ऐतिहासिक शोधादरम्यान, मिळालेला खजिना म्हणजे सोन्याचे दागदागिने हे अत्यंत दुर्मीळ आहेत. मात्र हा खजिना कुणी आणि कशासाठी लपवून ठेवला होता. यामागचं गुपित अद्याप उघड होऊ शकलेलं नाही.
रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार २७ वर्षीय लोरेंजो रुइजर वयाच्या दहाव्या वर्षापासून खजिन्यांचा शोध घ्यायचे. त्यासाठी ते मेटल डिटेक्टरचा वापर करायचे. याच मेटल डिटेक्टरचा वापर करून त्यांनी २०२१ मध्ये नेदरलँडमधील छोटसं शहर असलेल्या हुगवुडमध्ये सोन्याच्या खजिन्याचा शोध घेतला होता. रुईजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, माझ्यासाठी एवढ्या मौल्यवान खजिन्याचा शोध घेणं खूप खास बाब आहे. खरोखरच मी तिचं वर्णन शब्दात करू शकत नाही. मी याआधी कधीही अशा प्रकारच्या शोधाची अपेक्षा केली नव्हती. तर माझ्यासाठी ही बाब दोन वर्षे लपवून ठेवणंही खूप कठीण होतं. तरीही मी गप्प बसलो. कारण या प्राचीन वस्तू म्हणजेच खजिन्यात सापडलेल्या गोष्टींची देखभाल, स्वच्छता, तपास आणि इतिहासाचा शोध घेण्यासाठी नॅशनल म्युझियमच्या टीमला काही वेळाची गरज होती.
तपासामध्ये समोर आले की, या नाण्यांमधील सर्वात नवं नाणं हे १२५० सालाच्या आसपासचं असू शकतं. त्यांमुळे हा खजिनासुद्धा त्याच काळात लपवलेला असण्याची शक्यता आहे. तर म्युझियमने काढलेल्या पत्रकात म्हटलंय की, नेदरलँड्ससाठी हाय मिडल एजचे सोन्याचे दागिने ही खूप मोठी दुर्मीळ गोष्ट आहे.
इतिहासकारांच्या मते १३ व्या शतकादरम्यान, डच भाग असलेल्या वेस्ट फ्राइस्लँड आणि हॉलंडदरम्यान युद्ध झालं होतं. त्या युद्धात हुगवुड बे महत्त्वपूर्ण केंद्र होते. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळच्या कुठल्यातरी मातब्बर व्यक्तीने आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी त्या लपवल्या असाव्यात.