जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला नोटांचं बंडल सापडलं तर किती आनंद होईल हे काही वेगळं सांगायला नको. पण जर तुम्हाला १२ वेळा असंच १.८२ लाख रूपये असलेलं बंडल सापडत असेल तर? तुम्हाला वाटत असेल की, ही एखादी काल्पनिक कथा आहे. पण नाही. असं एका गावात घडलं आणि आता पोलिसही या घटनेने हैराण झाले असून पैसे कोण सोडून जातंय, याचा शोध घेतला जात आहे.
ही घटना आहे इंग्लंडमधील ब्लॅकहॉल कोलियरी या छोट्याशा गावातील. मेट्रो यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या ५ वर्षात १२ वेळा २ हजार पाउंड रूपये सापडले आहेत. म्हणजे कुणीतरी व्यवस्थित नोटांचं बंडल करून वेगवेगळ्या ठिकाणी सोडून जातं. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकवेळी रक्कम एकसारखीच असते. ती म्हणजे १.८५ लाख रूपये.
आता पोलिसही या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. तसेच गावातील कुणीच अशाप्रकारे पैसे ठेवून जाताना पाहिलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची उत्सुकता सगळीकडे बघायला मिळत आहे. पहिल्यांदा असं वाटलं होतं की, कुणीतरी विसरून गेले असतील. पण १२ वेळा असं होत असेल तर हे स्पष्ट आहे की, हे कुणीतरी मुद्दामहून करतंय.
यात आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ज्या वेळी गावातील लोकांना पैसे सापडले ते पोलिसांकडे घेऊन गेले. कुणीही परस्पर पैसे खर्च केले नाही. दरम्यान अनेकांची विचारपूस झाली. अनेक फ्रिंगरप्रिंट्स घेण्यात आलेत. पण अजूनही हा प्रकार रहस्यच आहे.
पोलिसांनी सांगितले की, 'पैसे दरवेळी अशा ठिकाणी ठेवले जातात, जिथे ते पटकन दिसून येतील. कदाचित कुणी दान करण्याच्या उद्देशाने असं करत असावं'. कदाचित गावातील लोकांबाबत ती व्यक्ती ऋणी असेल म्हणूनही तो पैसे ठेवून जात असेल.