गेल्या शुक्रवारी फिलिपिन्सच्या दक्षिणेतील पलावनमध्ये एक भाऊ त्याच्या लहान बहिणीचा जीव वाचवण्यासाठी थेट मगरीसोबत भिडला. रिपोर्ट्सनुसार, १२ वर्षीय हॅना लिसा जोश हाबी तिच्या १५ वर्षीय भावासोबत बांबूच्या एका पुलावरून जात होती. दरम्यान अचानक १४ फूटाच्या एक मगराने तिचा पाय पकडला आणि तिला पाण्यात ओढून नेलं. यावेळी हिंम्मत दाखवत भावाने मगरीशी दोन हात करत बहिणीचा जीव वाचवला.
हॅनाने सांगितले की, पुलावर एक छोटा गॅप होता. ज्यात तिचा पाय अडकला आणि खाली पाण्यातील मगरीने लगेच तिचा पाय पकडला. मात्र, अशावेळी घाबरून न जाता तिच्या भावाने आजूबाजूला पडलेल्या दगडांनी मगरीवर हल्लाबोल केला. त्यानंतर मगर हॅनापासून दूर गेली.
यात १२ वर्षीय हॅनाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे, मात्र, सुदैवाने तिचा जीव वाचला. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं असून स्थानिक रिपोर्ट्समध्ये ती आता बरी असल्याचं सांगितलं आहे.
'भावाने वाचवला माझा जीव'
हॅनाने पोलिसांना सांगितले की, मगर फार मोठी होती. मगरीचे मोठाले दात पाहून ती रडायला लागली होती. पण तिचा भाऊ घाबरला असता ती आज जिवंत राहिली नसती. त्याने तिचा जीव वाचवला.
हॅनाचा भाऊ हाशिमने सांगितले की, 'आम्ही पुलावरून जात होतो, तेव्हा अचानक लक्षात आलं की, माझी बहीण माझ्या मागे नाहीये. मी मागे वळून पाहिलं तर मला मगरीचं डोकं दिसलं. मला काही सुचलं नाही तर मी मगरीला पळवून लावण्यासाठी दगड फेकू लागलो'.